श्रीरामपूर प्रतिनिधी:
शहरातील सेंट झेवियर्स ही उपक्रमशील शाळा म्हणून सर्वत्र ओळखली जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नवनवीन उपक्रमांचे आयोजन या शाळेत केले जाते. चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ज्ञानार्जनासाठी विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना निर्माण व्हावी म्हणून शाळेचे प्राचार्य फा.टायटस थंगराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विद्यार्थी सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांतर्गत सुप्रसिद्ध वक्ते व आदिवासी सेवक प्राध्यापक बाबा खरात यांनी खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. आपल्या भाषणा दरम्यान देशभक्तीपर व जनजागृती पर गीते सादर करून त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अगदी खिळवून ठेवले. विनोदात्मक शैलीत विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधताना ते म्हणाले की,संघर्षाला घाबरू नका संघर्ष आपल्यात सामर्थ्य निर्माण करतात. निराश न होता प्रयत्न सुरू ठेवा एक दिवस यश नक्की मिळते. शिस्त, संयम, नियोजन व कष्ट हा यशाचा सन्मार्ग आहे या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा.
निर्व्यसनी रहा, फुलासारखे निरागस जीवन जगा. चारित्र्यसंपन्न रहा, अपमान व अपयश पचवण्याची ताकद ठेवा.
मिशन शाळेतील दर्जेदार शिक्षणाचा स्वतःच्या व देशाच्या विकासासाठी उपयोग करा.
संविधानास अभिप्रेत राष्ट्रभक्ती जोपासणारा विद्यार्थी सेंट झेवियर्स मधून तयार होत असल्याने विशेष आनंद वाटतो असेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक रवि त्रिभुवन यांनी केले. प्राचार्य फा. टायटस यांच्या हस्ते प्रा. खरात यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी समन्वयिका अनिता पाठक, मिलाग्रीन कदम सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी जगदीश बनसोडे यांनी आभार मानले.
वृत्तसंकलन:
समता न्यूज नेटवर्क श्रीरामपूर- 9561174111




